पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरकारी नोकरीत स्त्रियास दाखल करण्यास हरकत नाही.
त्यांच्याशी सभ्यतेने वागावे.
 ज्या जागी केवळ स्त्रीवर्गाकडून नोकरी घेतली पाहिजे, अशा जागांशिवाय करून बाकी सर्व ठिकाणी पुरुष वर्गाचे नोकर आहेत. तथापि त्यातील काही ठिकाणी स्त्रियांस नोकरीत घेण्यास हरकत आहे, असे नाही; परंतु एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे ती ही की, हल्लीची स्थिती ध्यानात घेतली तर केवळ शिक्षणात काही स्त्रिया पुढे आल्या. तेवढ्यावरूनच त्यास नोकरीत दाखल करता येईल, असे नाही. आपल्या समाजात स्त्री- पुरुषांची नीतिमत्ता जोरदार व भक्कम झाल्याशिवाय स्त्रियांस नोकरीत ठेविल्यापासून कित्येक प्रसंगी हानी होण्याचा संभव असतो, हे विसरून जाता कामा नये. शिवाय हल्लीचे स्रियांचे शिक्षण लक्षात घेता, त्यांच्या शिक्षणाविषयीचा अतिशयोक्तीचा ग्रह होण्याचा संभव आहे, हेही ध्यानात ठेवावे. या व दुसऱ्याही गोष्टींचा विचार करता असे ठरविणे योग्य दिसते की, स्त्रियास नोकरीत दाखल करण्यात हरकत नाही, असे सामान्य धोरणावर लिहिले आहे.
 तथापि, कारकुनाच्या दर्जाच्या नोकरीवर दाखल करण्याविषयी कोणी स्त्री अर्जदार आल्यास, त्या अर्जाविषयी दिवाणांकडून मंजुरी मिळवावी व त्याच्यावरील जागेसाठी कोणी स्त्री उमेदवार असेल तर खुद्द हुजूरची मंजुरी घ्यावी. मात्र पोलिस वगैरे ठिकाणी जेथे स्त्रियांकडून नोकरी होण्यासारखी नसेल, तेथे स्त्रियांस नेमू

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २४