पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नये हे उघड आहे. नोकरीत दाखल झालेल्या स्त्रियांचे कपडेलत्ते वगैरेंबद्दल पुढे-मागे काही नियम करण्याची आवश्यकता वाटली तर तसे नियम करवून घ्यावे. नियमाप्रमाणे स्त्री नोकरांनी चालले पाहिजे, हे उघड आहे. कचेरीत किंवा कामावर जाताना स्त्रियांचे कपडे साधे असून भपकेदार नसावेत. स्त्री नोकरांकडून काम घेण्यात ढिलाई चालवू नये किंवा असंतोषकारक काम निभावून घेऊ नये. त्यांच्याशी सर्वांनी सभ्यतेने व सरळ रीतीने वागणू ठेवावी. कोणी स्त्री लेडी डॉक्टरच्या जागेवर नेमली जाईल, तर तिने डॉक्टरांचे सर्व काम करण्यास तयार असले पाहिजे, केवळ स्त्री रोग्यापुरतेच तिने काम करावयाचे आहे, असे समजू नये. '
 स्त्री सक्षमीकरणाची चळवळ एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर महाराजांनी हा हुजूर हुकूम केला होता. या हुकुमाशी सुसंगत असे विचार महाराजांनी १९ जानेवारी १९२४ रोजी बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मांडले होते. यावेळी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती या नात्याने बोलताना महाराज म्हणतात, “आम्हाला बंधमुक्त का करीत नाही?" असा सवाल आज स्त्रीवर्ग तुमच्या बुद्धीला टाकीत आहे, तोच सवाल अधिक जोराने अस्पृश्यांचा वर्गही करीत आहे. निर्दय रूढीच्या लंगड्या आधारावर या शूद्रातिशूद्रांची किती मोडतोड आपण चालविली आहे, किती हतवीर्य आपण त्यांना करीत आहोत! आपल्या या कृत्याचे समर्थन करणे अशक्य आहे. या दुर्दैवी लोकांची दाद हिंदू महासभा लावू पाहत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २५