पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढारलेल्या विद्यापीठाच्या मंडळींनाही माझी विनंती आहे की, जगातील इतर चार विद्वान मंडळीत तुमचा नावलौकिक राहावा. असे ज्याअर्थी तुम्हाला वाटत आहे त्याअर्थी कोणत्याही सच्छिल व सद्हेतुप्रेरित हिंदू माणसाला इथे येऊन आपल्या प्राचीन आचारविधीचे व धर्मग्रंथांचे अध्ययन करण्याला तुम्ही कसलीही आडकाठी ठेवू नये; हिंदू धर्मविद्या प्राप्त करून घेण्याच्या काम लिंगभेद किंवा जातिभेद यांची हरकत मानू नये."
 उक्ती आणि कृती यांचा मेळ असणारे समाजक्रांतिकारक आणि समाजसुधारक अपवादात्मक असतात. याबाबत भारतातील सर्वोत्तम आदर्श म्हणून महात्मा फुलेंकडे पाहिले जाते. परंतु फुले हे राज्यकर्ते नव्हते तर स्वतंत्रपणे काम करणारे समाजनेते होते. अशावेळी कोणतीही स्पष्ट भूमिका घेणे, वैयक्तिक पातळीवर कृतिशीलता जपणे तुलनेने सोपे असते. परंतु राज्यकर्ता आणि समाजक्रांतिकारक या दोन्हीही भूमिका एकाचवेळी पार पाडत असताना ही बाब अधिक आव्हानात्मक होते. उक्ती आणि कृती यांचा ‘कमाल’ मेळ घालण्यामध्ये फुलेंच्या नंतर सयाजीरावांचा नंबर लागतो. एक पारंपरिक राज्यकर्ता असूनही सयाजीरावांनी धोरण आणि कृती यांचा उत्तम मेळ घातल्याचे स्पष्ट आणि असंख्य दाखले मिळतात. सयाजीरावांची भाषणे 'आधी केले आणि मग सांगितले' या वर्गातील होती. १८८६ पासून स्त्रियांसाठीचे उपक्रम आणि कायदे या दृष्टीने सयाजीराव कृतिशील होते. या

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २६