पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कृतिशीलतेशी जोडून वरील भाषण विचारात घ्यावे लागते. त्याचप्रमाणे वरील भाषणानंतर महाराजांनी स्त्रियांना दिलेले पुढील अधिकारसुद्धा या भाषणाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासावे लागतात.
 बडोदा संस्थानातील स्त्रियांना सयाजीरावांनी कोणत्याही मागणीशिवाय मतदानाचा अधिकार दिला. सयाजीराव हे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले राज्यकर्ते ठरतात. त्याचबरोबर लोकल बोर्डस् आणि म्युनिसिपालिटीमध्ये कायदेशीर सदस्यत्व तसेच लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही सदस्यत्व देणारे सयाजीराव पहिले शासनकर्ते ठरतात.
कूचबिहार संस्थानची पार्श्वभूमी

 तत्कालीन भूतान संस्थानच्या हद्दीला लागून असणारे कूचबिहार हे आदिवासी संस्थान होते. कूचबिहारचे राजघराणे, मानकरी मंडळी आणि प्रजा हे सर्वजण आदिवासी असले तरी कारकुनापासून दिवाणापर्यंतच्या सर्व अधिकारी पदावर बंगाली व्यक्तींचा वरचष्मा होता. जंगली साधनांवर अवलंबून असणारे या संस्थानातील कोळी लोक अविकसित स्वरूपातील शेती करून आपला उदरनिर्वाह करत. या आदिवासींची सांपत्तिक स्थिती कंगालीच्या सदरात मोडणारी होती. कुचबिहार संस्थानचे उत्पन्न जवळपास कोल्हापूर संस्थानइतकेच असल्याचे निरीक्षण विठ्ठल

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २७