पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामजी शिंदेंनी नोंदवले आहे. या संस्थानात विद्यार्थ्यांना कला शाखेचे पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. या महाविद्यालयात ३०० विद्यार्थी मोफत शिक्षण घेत होते.
इंदिराराजेंचा विवाह : राजर्षी शाहूंच्या धनगर
मराठा विवाहाला नैतिक बळ
 महाराष्ट्राला शाहू महाराजांच्या प्रेरणेने शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील चुलत बहिणीचा इंदूरच्या यशवंतराव होळकरांबरोबर १९२४ मध्ये झालेला मराठा-धनगर हा आंतरजातीय विवाह माहीत आहे. या विवाहासाठी शाहू महाराज १९१८ पासून प्रयत्नशील होते. परंतु १९२२ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत शाहूंना यामध्ये यश मिळाले नाही. या संदर्भात शाहूंचे पहिले चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे म्हणतात, “इंदूरच्या युवराजांचा महाराजांच्या जन्म घराण्यातील एका मुलीशी विवाह जुळून यावा म्हणून महाराजांनी पुष्कळ प्रयत्न केला; परंतु बहुधा दुसऱ्या एका मराठा जातीच्या महाराजांच्या विरोधकांमुळे, त्या वेळी महाराजांच्या या प्रयत्नास यश आले नाही. मात्र १९२४ च्या फेब्रुवारी महिन्यात महाराजांनी सुचविल्याप्रमाणे हा धनगर- मराठा विवाहसंबंध जुळून आला, हे येथे सांगितले पाहिजे." परंतु शाहू महाराजांना या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा देणारा

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / २८