पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकुलते एक कन्यारत्न होत्या. त्यांचा जन्म १ मार्च १८९२ ला झाला. इंदिराराजे मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना संस्कृतही येत होते. महाराजांबरोबरच्या युरोप-अमेरिकेच्या प्रवासाने त्यांची दृष्टी विशाल झाली होती. त्यांची बुद्धी फार कुशाग्र होती.
 एप्रिल १९९९ मध्ये ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे यांच्याशी सयाजीरावांची कन्या इंदिराराजे यांचा विवाह ठरविण्यात आला. यानंतर लगेचच महाराज युरोप दौऱ्यास निघून गेले. युरोपहून परत आल्यावर मुहूर्त ठरवून लग्न समारंभ उरकून टाकण्याचे निश्चित करण्यात आले. दिल्ली दरबार संपताच डिसेंबर महिन्यात विवाह करण्याचे ठरले.

 १२ सप्टेंबर १९९१ ला बादशहा पंचम जॉर्ज यांचा दिल्ली येथे दरबार भरला होता. या दरबारच्या दिवशी वरिष्ठ सत्तेसंबंधीच्या रागाने आणि प्रकृती अस्वास्थ्याने सयाजीराव बेचैन होते. दरबारात व्हॉइसराय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या स्वागतपर भाषणानंतर बादशहा पंचम जॉर्ज यांना मुजरा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सयाजीरावांनी अजाणतेपणे बादशहांना ठरल्याप्रमाणे मुजरा केला नाही तर महाराणींना मुजराच केला नाही. त्यामुळे सयाजीरावांनी बादशहाचा अपमान केल्याचा सयाजीरावांविरुद्धचा अतिशयोक्त मजकूर विविध वृत्तपत्रांतून छापून आला. सयाजीरावांचे हे मुजरा प्रकरण जगभर गाजले.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३१