पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंदिराराजेंचा क्रांतीसंघर्ष
 दिल्ली दरबारच्या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी माधवरावांनी लंडनमध्ये सरदेसाईंची भेट घेतली. या भेटीत माधवरावांनी सरदेसाईंशी दिल्ली दरबारच्या घटनेसंदर्भात चर्चा केली. सयाजीराव महाराजांनी ब्रिटिश सरकारशी वाद घालून त्यांचा रोष ओढवून घेतला आहे. महाराजा सयाजीराव आणि बादशहा पंचम जॉर्ज यांच्यातील हा रोष काढून टाकून त्यांच्यात मैत्री घडवून आणण्याचा आपला हेतू असल्याचे माधवरावांनी सरदेसाईंना सांगितले. माधवरावांचा हा हेतू साध्य झाला तरच ते सयाजीरावांचे जावई होण्यास तयार होते. सयाजीराव राजद्रोही ठरले तर त्यांच्या कन्येशी विवाह करण्याची माधवरावांच्या मनाची तयारी नव्हती.
 आपले ठरलेले लग्न मोडू नये अशी माधवरावांची तीव्र इच्छा होती. त्यावेळी इंदिराराजे १९ वर्षाच्या तर माधवराव ४० वर्षांचे होते. या दोघांच्या वयात २१ वर्षांचे अंतर होते, शिवाय त्यांची पहिली पत्नी जिवंत होती. माधवराव शिंदे अत्यंत सनातनी वृत्तीचे होते. दिल्ली दरबारच्या वेळी माधवराव शिंदे व इंदिराराजे यांच्यात वारंवार भेटी होऊ लागल्या. या भेटीदरम्यान इंदिराराजे आणि माधवराव यांच्यात काही कारणाने वाद उत्पन्न झाला.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३२