पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माधवराव शिंदे म्हणत, “मला मूल नाहीं म्हणून पहिली बायको जिवंत असता दुसरी करणार.” यावर इंदिराराजे म्हणत, “नवऱ्याचे प्रेम नसेल तर मला केवळ पुत्रवती म्हणवून घेण्याची हौस नाही." असा दोघांमध्ये वाद झाला. इंदिराराजेंना फक्त मुलासाठी विवाह करून माधवरावांची दुसरी पत्नी म्हणून दुय्यम दर्जा नको होता. एकंदरीत या विवाहापासून त्या आनंदी नव्हत्या. सयाजीराव आपल्या प्रशासकीय कामकाजात व्यस्त असल्यामुळे या दोघांमध्ये नेमके काय चालू आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

 दिल्ली दरबार संपताच सर्व मंडळी बडोद्यास परत आली. राजपुत्र विद्यालय सुरू असल्याने केवळ इंदिराराजे व त्यांच्या मैत्रिणींना शिकविण्याचे काम सरदेसाईंना होते. इंदिराराजेंचे लग्न होऊन त्या ग्वाल्हेरला जातील आणि सरदेसाईंना दुसरे काम दिले जाईल असा तो काळ होता. परंतु परत येताच महाराजांनी सरदेसाईंना एक मुख्य काम दिले. ते म्हणजे लग्न होईपर्यंत इंदिराराजेंना सतत अभ्यासात गुंतवून ठेवण्याचे. त्या काळात सरदेसाई वर्षभर इंदिराराजेंचे शिक्षक म्हणून होते. महाराजांच्या सूचनेवरून इंदिराराजे यांचे मन कामात गुंतवून ठेवण्यासाठी सरदेसाई कालिदासाचे शाकुंतल नाटक राजकन्या व त्यांच्या मैत्रिणींना शिकवू लागले. रोज दोन तास वाचून दोन-चार महिन्यांत ते पुस्तक चिकित्सेने वाचून संपविले.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३३