पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. पवारांना पाठवलेल्या पत्रात सयाजीराव लिहितात, “इंदिरा राजेंनी बडोदा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. ही गोष्ट आपल्या काही लोकांना आणि नातेवाईकांना फारशी आवडलेली नाही, आवडणारी नाही. नवीन सुधारणांबद्दल नेहमीच संशय घेतला जातो.” परंतु सयाजीराव आपल्या निर्णयावर ठाम राहिले. इंदिराराजेंनी सर्वसामान्य मुलींबरोबर बडोद्यात कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. विशेष बाब म्हणजे राजघराण्यातील व्यक्ती म्हणून इंदिराराजेंना बडोदा कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिली जात नव्हती. एका बाजूला बादशहा पंचम जॉर्ज यांच्या अपमानाचे प्रकरण महाराजांच्या मनात घोळत होते तर दुसरीकडे महाराणींच्या मनात इंदिराराजेंच्या विवाहाचा विषय सतत चालू होता. बादशहांच्या अपमानाचे हे प्रकरण सयाजीराव आणि चिमणाबाई दोघे मिळून सरदेसाईंकडून लिहून घेत असत. परंतु इंदिराराजेंच्या या विचाराबद्दलची माहिती महाराजांना नव्हती.
रियासतकार सरदेसाईंची यशस्वी मध्यस्थी

 सरदेसाई चिमणाबाईंना भेटून इंदिराराजेंच्या विवाहासंदर्भातील आपले विचार बोलून दाखविले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु चिमणाबाई म्हणाल्या, " वचन गेले आहे तर मुलीने शिंदे महाराजांशींच विवाह केला पाहिजे. दुसरा मार्ग नाही." यावर सरदेसाई अगदी स्पष्टपणे

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३५