पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नये. सयाजीरावांकडे कोणाचेही काम असल्यास त्याला त्या कामाची माहिती अगोदरच द्यावी लागत असे. आपली मुले,सुना किंवा कोणीही नातेवाईक भोजनास वगैरे येऊन त्यावेळी आपले म्हणणे महाराजांना सांगत असे. हा भोंगळ कारभार सयाजीरावांनी बंद केला.
 मुलांनासुद्धा वडिलांशी अचानकपणे वाटेल ते बोलण्यास मनाई होती. त्यांना जर महाराजांशी बोलायचे असेल तर त्यांनीही सेक्रेटरी व ए.डी.सी. यांच्यामार्फत महाराजांना अगोदर सूचना द्यावी असा नियम होता. एखादा विषय अचानकपणे समोर आल्याने त्यावर योग्य उपाय निघणार नाही. जर आपल्याला एखाद्या विषयाची माहिती असेल तर त्यावर अगोदरच आपण काहीतरी योजना ठरवू शकतो. असा हा नियम करण्यामागे सयाजीरावांचा हेतू होता. व्यावहारिकदृष्ट्या हा नियम कितीही योग्य असला तरी कुटुंबातील व्यक्तींना तो न पटणाराच होता. सरदेसाईंनी अनेक वेळा हा अनिष्ट प्रकार महाराजांना स्पष्टपणे बोलून दाखविला, “तुमच्या मुलांना खरे आईबाप नाहीत. तुमच्याकडे येऊन त्यांना रडण्याचाही हक्क नाही. हा प्रकार निसर्गविरोधी होय." पण यावर महाराज म्हणत, “अहो रावसाहेब, मला व्यवहारासाठी असे वागणे भाग पडते. माझ्या मुलांप्रमाणेच प्रजेकडेही मला लक्ष द्यावे लागते."

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३७