पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांचा समजूतदारपणा
 अशा परिस्थितीत सरदेसाईंनी इंदिराराजेंना एक युक्ती सुचवली. या संदर्भातील हकिकत रियासतकार सरदेसाईंनी 'श्री. सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासांत' या पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. सरदेसाई लिहितात, " त्यावर मी त्यांना एक युक्ती सुचवली. मी म्हटले, "तुम्ही वडिलांना खुलासेवार एक पत्र लिहा." त्या म्हणाल्या, “पत्र त्यांना पोचणार नाही आणि पोचले तरी ते वाचणार नाहीत.” मी सांगितले, 'ती जबाबदारी मी घेतो. पत्र त्यांच्या हाती पडावे आणि ते त्यांनी स्वतः वाचावे ही तजवीज मजकडे लागली. ' आदल्याच दिवशी महाराज कडीपट्टणला गेले असून तिकडे त्यांचा मुक्काम आठ-चार दिवस व्हायचा होता. मी जवळ बसून इंदिराकडून सयाजीरावांना पत्र लिहविले. मीच तिकीट लावून टपालात टाकले आणि महाराजांबरोबर स्वारीत सेक्रेटरी होते त्यास मी स्वतः पत्र लिहून कळविले, आजच्या टपालाने श्री. इंदिरा राजे यांनी महाराजांना स्वतः पत्र लिहिले आहे हे त्यासच खुद्द पोचेल असे करावे. "

 सरदेसाईंची कल्पना यशस्वी झाली. ठरल्याप्रमाणे इंदिराराजेंचे पत्र महाराजांना मिळाले. सयाजीरावांनी ते पत्र लक्षपूर्वक वाचून लगेच स्वहस्ताने उत्तर लिहून इंदिरांना पाठविले. महाराजांचे इंदिरांच्या पत्राला पाठविलेले उत्तर अत्यंत प्रेमळ होते. त्यांनी मुलीचे समाधान जिव्हाळ्याने केले. सयाजीराव लिहितात, “तुझ्या इच्छेविरुद्ध मी काही करणार नाही, तुझे कल्याण होईल

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३८