पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तितके करावे हीच माझीही उत्कंठा आहे. लग्नाच्या बाबतींत तुला आपला वर पसंत करण्याची पूर्ण परवानगी आहे. शिंदे पसंत नसतील तर मी आग्रह करणार नाही. तू ठरविशील ते मी मान्य करीन.” सयाजीरावांचे हे उत्तर वाचून इंदिराराजेंना खूप आनंद झाला.
इंदिराराजेंचे 'निर्णायक' पत्र
 याच दरम्यान केवळ मूल नसल्यामुळे दुसरा विवाह करू इच्छिणाऱ्या माधवराव शिंदेशी होणारा विवाह आपल्याला मान्य नसल्याचे इंदिराराजेंनी स्वतः पत्राद्वारे शिंदेंना कळवले. या पत्रा इंदिराराजे लिहितात, “रा. रा. माधवराव शिंदे, महाराज ग्वाल्हेर यांशी इंदिरा राजेचा स. न. माझे हे पत्र पाहून आपणास धक्का बसेल. पण वेळीच निर्णय घेणे आवश्यक असल्याने आपल्या दोघांच्याही पुढील आयुष्यासाठी चांगले म्हणून मी हा अवघड गुंता वेळीच सोडविण्यासाठी धाडस करीत आहे, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. आपल्या काही भेटी झाल्या, बोलणे झाले, त्यातून तुम्ही म्हणाला, "तुम्हाला मूल नाही म्हणून पहिली बायको जिवंत असताना माझ्याशी विवाह करत आहात.” माझे मत असे आहे नवऱ्याचे प्रेम नसेल तर मला केवळ पुत्रवती म्हणवून घेण्याची हौस नाही. आयुष्यभर आपली राणी बनून पडद्याआड राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. आमचे पिताश्री श्रीमंत सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ३९