पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या एकुलत्या एक कन्येच्या विवाहाच्या बाबतीत इतका राग मनात धरला की इंदिराराजेंशी आपले संबंध तोडून टाकले. विवाहाच्या सहा-सात वर्षानंतर इंदिराराजे आजारी असताना सयाजीराव महाराज स्वतः कलकत्त्यास इंदिराराजेंना भेटायला गेले व त्यांना बरे वाटल्यावर बडोद्यास सन्मानाने घेऊन आले.
कन्या गायत्रीदेवींचे आत्मकथन

 या विवाहासंदर्भात इंदिराराजेंच्या कन्या गायत्रीदेवी यांनी 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' या त्यांच्या आत्मकथनात नोंदवलेल्या आठवणी महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक आहेत. गायत्रीदेवी लिहितात, “कूचबिहारच्या राजपुत्राशी लग्न करू द्यावं ही आईची इच्छा मात्र सहज पूर्ण झाली नाही. तिला तीव्र विरोध झाला. कूचबिहार बडोद्यापेक्षा कमी महत्त्वाचं आणि लहान संस्थान होतं, ते राजघराणं वेगळ्या जातीचं होतं, उच्च मराठा कूळ नव्हतं, राजपुत्र धाकटा मुलगा असल्याने पुढे गादीवर येण्याची शक्यता नव्हती हे सगळे मुद्दे असले तरी आजोबांच्या दृष्टीने ते कमी महत्त्वाचं होते. आजोबांना सगळ्यात जास्त खटकलं ते त्या संस्थानाचं पाश्चिमात्त्य वळण. त्याला मात्र त्यांचा पूर्ण विरोध होता. कूच बिहारचे संस्थानिक एडवर्डियन समाजात मिसळत होते. परदेशी पाहुण्यांची त्यांच्याकडे सतत वर्दळ होती, कोणत्याही स्तरातल्या लोकांची सरबराई केली जात होती हे आजोबांना मुळीच पटत नव्हतं. त्यांच्या परंपराप्रिय विचारांना असं मुक्त वागणं मानवण्यासारखं नव्हतं.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४२