पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निघाले असता त्यांचा मुक्काम मुंबईत होता. आईही अर्थात त्यांच्याबरोबर होती. कूचबिहारच्या राजपुत्राला ताबडतोब बोलावणं गेलं. तिथल्या राजवाड्याच्या ग्रेट दरबार हॉलमध्ये अत्यंत औपचारिक पद्धतीने त्याचं स्वागत झालं. आजोबांच्या डाव्या 'बाजूला त्यांचे प्रधान तर उजव्या बाजूला मुंबईचे ब्रिटिश रेसिडेंट बसले होते. आजी वरच्या गॅलरीत पडद्याच्या आड बसून सारं पाहत होती. त्यावेळी राजपुत्राला अतिशय कडक शब्दात बजावण्यात आलं की, कोणत्याही परिस्थितीत त्याला आईशी लग्न करता येणार नाही. त्याने ही गोष्ट डोक्यातून कायमची काढून टाकावी. या बैठकीनंतर, आता कोणतीही आशा उरलेली नाही अशा भावनेने राजपुत्राने मुंबई सोडली.
 पण खरं सांगायचं तर माझ्या आजी-आजोबांचा विरोध आता संपुष्टात यायला लागला होता. मुंबईतली त्यांची बैठक, त्यांची अखेरची भूमिका स्पष्ट करणारी होती. ते इंग्लंडमध्ये आले. कदाचित माझ्या आईच्या हट्टी प्रतिकारामुळे असेल, अफवांमुळे किंवा अंत:प्रेरणेने असेल, आईचा पळून जायचा बेत आहे असं आजी-आजोबांना जाणवलं. त्यामुळे हताश होऊन, विरोध मागे घ्यायचं त्यांनी ठरवलं. कारण आई खरंच पळून गेली असती तर ते एक मोठंच बदनामीकारक प्रकरण झालं असतं. त्यांनी लग्नाला परवानगी तर दिली, पण लग्नाच्या तयारीत कोणताही सहभाग घ्यायला नकार दिला.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४४