पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्या कन्या होत्या. सुनीतीदेवींनी आपल्या संस्थानाबाहेरच्या बंगालमधील स्त्रियांच्या उन्नतीसाठी भरपूर कार्य केले. परंतु कूचबिहारमधील पडदा पद्धती नष्ट करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट मत गायत्रीदेवींनी नोंदवले आहे. सुनीतीदेवी संस्थानाबाहेर कलकत्ता आणि भारतातील इतर भागात भरपूर फिरल्या.
 परंतु आपल्या संस्थानात मात्र त्यांनी 'पडद्यात' राहणेच अधिक पसंत केले. त्यांच्या बरोबरच्या इतर स्त्रियांनी राजवाड्याचा दर्शनी भागसुद्धा पाहिला नाही. अशा परिस्थितीत इंदिराराजेंच्या विवाहानंतर त्या उघड्या गाडीतून कूचबिहारला गेल्या तेव्हाच या संस्थानातील पडदा पद्धत नष्ट झाल्याचे गायत्रीदेवी सांगतात. सयाजीरावांनी बडोद्यात स्त्री उन्नतीसाठी राबवलेल्या धोरणाच्या इंदिराराजे स्वत: ' साक्षीदार' आणि 'लाभार्थी' होत्या. इंदिराराजेंच्या माध्यमातून कूचबिहारमध्ये झालेल्या सुधारणा म्हणजे सयाजीरावांनी आयुष्यभर स्त्रीमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचा 'परिपाक' होता.

 इंदिराराजेंनी आई-वडिलांनी ठरवलेला विवाह मोडून स्वतः ठरवून केलेला मराठा - आदिवासी विवाह भारताच्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या इतिहासात 'मैला'चा क्रांतिकारक दगड ठरतो. कारण इंदिराराजेंनी आपल्या निर्णयावर ठाम राहून केलेला हा विवाह सामान्य नव्हता. कारण सयाजीरावांसारख्या अत्यंत प्रागतिक, प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तीची कन्या

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ४९