पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असणे हे या विवाहातील प्रमुख आव्हान होते. तर ज्या माधवराव शिंदेशी त्यांचा विवाह ठरला होता ते ग्वाल्हेर संस्थानही तितकेच प्रतिष्ठित होते.
 महत्त्वाचे म्हणजे आई-वडिलांनी विवाह ठरवून साखरपुडासुद्धा झाला होता. यामध्ये दोन्हीही संस्थानांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सयाजीरावांची एकुलती कन्या म्हणूनसुद्धा प्रचंड मोठा भावनिक दबाव या विवाहावर होता. विशेष म्हणजे कूचबिहार हे राजघराणे असले तरी ते आदिवासी राजघराणे होते. परिणामी भारतीय राजघराण्यांच्या परंपरेला आव्हान देण्याचे काम इंदिराराजेंकडून झाले होते. या विवाहाला आई-वडिलांचा स्पष्ट विरोध असतानाही ३ वर्षे संघर्ष करून एक राजकन्या आपला बंडखोर निर्णय तडीस नेते ही बाब खचितच कौतुकास पात्र ठरते.

 सयाजीरावांसारख्या प्रतिष्ठित पित्याला त्याचा शब्द माघारी घेऊन मुलगीच्या निर्णयाबरोबर जाणे किती आव्हानात्मक ठरले असेल याची कल्पना वरील तपशिलांवरून सहज येईल. एकूणच सगळ्यांच्याच भूमिकेचा कस तपासणारा हा विवाह भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासात अज्ञात राहतो ही बाब अस्वस्थ करणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे सयाजीरावांच्या सर्वच कामाचे हजारो संदर्भ बडोद्यात व्यवस्थित उपलब्ध असताना आपल्या संशोधन परंपरेने या सगळ्याबाबत इतकी अनास्था का बाळगली असेल याचे उत्तर प्रयत्न करूनही मिळत नाही. मानवी

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ५०