पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह

 'स्त्री हे जातिव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहे' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. कारण जातिव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी या व्यवस्थेने स्त्रीवर सोपवली होती. ज्याप्रमाणे 'कर्म आणि पुनर्जन्म' हा सिद्धांत जातिव्यवस्थेतील गुलामगिरी विनातक्रार स्वीकारण्यासाठी विकसित केला गेला त्याचप्रमाणे स्त्रीला समाजाच्या नैतिकतेचे संवर्धन करण्याची एकतर्फी जबाबदारीसुद्धा देण्यात आली. जातीअंताचा आग्रह धरणारे सर्वच समाजधुरीण आंतरजातीय विवाह हा जातीअंताचा सर्वात प्रभावी उपाय म्हणून सांगतात. आधुनिक भारतात भारतीय परंपरेला जे प्रमुख धक्के बसले ते मुख्यतः धर्म आणि जात सुधारणांच्या क्षेत्रातले होते. मिशनऱ्यांचे धर्मांतर, आधुनिक शिक्षणाचा प्रसार याबरोबरच पाश्चात्यिकरणाच्या प्रक्रियेमध्ये हिंदू समाजव्यवस्था ढवळून निघाली. फुलेंपासून क्रांतिकारक प्रबोधन पर्वास सुरुवात झाली. फुलेंची ही परंपरा सयाजीरावांनी विकसित केली. राजर्षी शाहूंनी सयाजीरावांच्या अनुकरणातून ती पुढे नेली.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ६