पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कल्पनासुद्धा महाराष्ट्रातीलच काय भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीलासुद्धा नाही. परिणामी स्त्रीशिक्षण असो, स्त्री उद्योग असो किंवा हिंदू कोड बिलासह हिंदू स्त्रियांच्या बाजूचे कायदे असोत, भारताला मानदंड ठरणारे स्त्री उन्नतीचे 'सयाजी मॉडेल' आपल्या समतावादी आंदोलनांच्या 'परिघाबाहेर' राहिले.
स्त्री उन्नतीचे 'सयाजी मॉडेल'
 १८९१ मध्ये अस्पृश्य मुलींसाठी स्वतंत्र शाळेची स्थापना करून शाळेच्या प्रमुखपदी अस्पृश्य महिलेची नियुक्ती केली. १८९३ मध्ये अमरेली तालुक्यातील १० गावांमध्ये सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षण कायद्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली. १८९३ मध्ये शाळेच्या एका मैलाच्या परिघात राहणाऱ्या ७ ते १० वर्षे या दरम्यानच्या सर्व मुलींना शाळेत येणे सक्तीचे करण्यात आले. जानेवारी १८९३ मध्ये भिल्ल, कोळी इ. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांची स्थापना करून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याबरोबरच भोजनाची मोफत व्यवस्था करण्याचा आदेश सयाजीराव महाराजांनी दिला. सयाजीरावांनी आदिवासी मुलींसाठी सोनगड येथे १८९६ ला पहिली मोफत निवासी शाळा सुरू केली. महाराजांनी १९०६ मध्ये संपूर्ण बडोदा संस्थानात सर्व जाती-धर्माच्या मुलामुलींसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा लागू केला. असा कायदा करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान आहे.

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ८