पान:महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालविवाह प्रतिबंधक कायदा मोडणाऱ्यांकडून घेण्यात येणारी दंड स्वरूपातील रक्कम प्राथमिक शाळेतील मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी वापरली जाई.
 मुलींच्या शाळांतील स्त्रीशिक्षिकांची गरज भागविण्यासाठी प्रशिक्षित स्त्रीशिक्षिका तयार करण्याच्या हेतूने १८८२ मध्ये फिमेल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. १९०९ साली या कॉलेजमध्ये बडोदा प्रांताबाहेरील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले. १९३० मध्ये महाराजांनी या कॉलेजला ३०,००० रुपये निधी दिला होता. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७ कोटी ९७ लाख रुपयांहून अधिक भरते. भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचा मान असणाऱ्या सावित्रीबाईंना १८९० मध्ये महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सयाजीरावांनी महिन्याला ५० रु. पेन्शन सुरू केली. फुल्यांचे दत्तक पुत्र यशवंत महाराजांच्या या मदतीमुळेच डॉक्टर होऊ शकले.
 १९०७ साली महिला ग्रंथालय स्थापन करून महिला ग्रंथपालाची नेमणूक करण्यात आली. हा संपूर्ण भारतातील पहिला प्रयोग होता. आपल्या प्रजेला सर्व क्षेत्रातील शिक्षण देण्याच्या हेतूने सयाजीरावांनी १८८६ साली उस्ताद मौलाबक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बडोद्यात म्युझिक स्कूलची स्थापना केली. फिमेल ट्रेनिंग कॉलेज, शहरातील गर्ल्स स्कूल तसेच नवसारी आणि पाटण येथील गर्ल्स स्कूलमधील मुलींसाठी स्वतंत्र म्युझिक स्कूल चालविले जात होते. सामाजिक क्षेत्रातील

महाराजा सयाजीराव आणि इंदिराराजेंचा क्रांतिकारक विवाह / ९