पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९१३-१४ मध्ये २ विज्ञान पदवीधरांना मद्रास येथे मोती उत्पादन व मत्स्य उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना बडोद्याच्या समुद्रकिनाऱ्याचे सर्वेक्षण करून मासेमारी व्यवसायाची सद्य:स्थिती व भविष्यातील विकासाच्या शक्यता याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. ओखा व महाद्वार येथे मोती व मत्स्य संशोधनासाठी दोन प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. या प्रयोगशाळेतील सर्व प्रयोग १९२०-२१ मध्ये पूर्ण झाले.
(iii) तेलबिया
 १९०५ साली सयाजीरावांनी कलकत्ता येथील कारखान्याच्या धरतीवर बडोद्यात एरंडेल तेलाचा कारखाना उभारण्याची शक्यता तपासण्यास सांगितले. या सर्वेक्षणानंतर बडोदा येथे एरंडेल तेलाचा कारखाना उभारण्यात आला. या कारखान्यात एरंडेल व इतर तेलबियांपासून तेल तयार करण्यात येत होते. परंतु अयोग्य यंत्र खरेदीमुळे या कारखान्यात कपाशीच्या तेलाचे उत्पादन होऊ शकले नाही.
(iv) तेल आणि साबण उद्योग

 १९१० मध्ये तेल उद्योग व साबण आणि इतर वस्तूंच्या उत्पादनाच्या शक्यता तपासण्यासाठी अमेरिकन तज्ज्ञांची नियुक्ती केली गेली. परंतु हा अमेरिकन तज्ज्ञ त्यांच्या अहवालामध्ये तेल व साबण निर्मिती उद्योगासंदर्भात योग्य माहिती व व्यावहारिक सल्ला देऊ शकला नाही.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १३