पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जाऊ लागल्या. त्यानुसार बडोदा येथे तीन आणि सिधपूरमध्ये एक कापड गिरणी सुरू करण्यात आली. त्यानंतर कलोल, पेटलाड आणि इतर ठिकाणी अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या.

बडोदा संस्थान गिरणी व इतर उद्योग संघ

 २२ एप्रिल १९१८ रोजी बडोदा गिरणी मालक संघटनेची बडोद्यात स्थापना करण्यात आली. २ मे १९३६ रोजी या संघटनेचे 'बडोदा संस्थान गिरणी व इतर उद्योग संघ' असे नामकरण करण्यात आले. या संस्थेला बडोदा व ब्रिटिश सरकारकडून मान्यता मिळाली. बडोदा संस्थानातील कापड गिरण्या, रासायनिक, लोह, रंगकाम, कागद, काडीपेटी इत्यादी उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे ४२ सदस्य या संस्थेचे सभासद होते. ही संस्था दिल्ली येथील भारतीय व्यापार व उद्योग मंडळ संघाशी संलग्न होती. बडोदा संस्थानात गिरणी व इतर उद्योग संघाच्या स्थापनेवेळी पुढील तीन प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवण्यात आली होती.
१) संघ सभासदांच्या हितांचे संरक्षण करणे.
२) बडोद्यातील व्यापार व उद्योगांचा विकास करणे.
३) संघ सदस्य आणि उद्योजक व कामगारांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे.

 जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारकडून करण्यात आलेल्या उत्तम प्रतीचे कापड व सूत इत्यादीच्या मागण्यांचे व्यवस्थापन गिरणी व इतर उद्योग संघाच्या संचालक मंडळाच्या

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १६