पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रक्रिया व विशेष आराखडा यांची माहिती दिल्यास त्यांच्या वस्तूंचा दर्जा सुधारून उत्पादनांना मागणी वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन सयाजीरावांनी १९३६ मध्ये 'हीरकमहोत्सवी कुटिरोद्योग' संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगार व कारागिरांच्या मुलांना विविध छोट्या व उद्योगांमधील प्रक्रियांच्या सुधारित पद्धतीचे प्रशिक्षण देणे हा होता. या कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी अनेक ठिकाणी विक्री केंद्रे सुरू केली होती.

 डायमंड ज्युबिली कुटिरोद्योग संस्थेमध्ये १९३९-४० मध्ये एकूण ७ वर्ग चालवले जात होते. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ६० इतकी होती. या मुख्य संस्थेबरोबरच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गांमध्ये कातडी कमावणे, सूतकताई व विणकाम, को- प्रिंटिंग व मधुमक्षिका पालन इ. उद्योगांचे प्रशिक्षण दिले जात होते. संस्थेकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणवर्गांचा लाभ राज्यातील अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी 'डायमंड ज्युबिली पीपल्स ट्रस्ट'च्या निधीतून १० हजार रु.ची तरतूद करण्यात आली. या निधीतून बडोद्यातील व बडोदा बाहेरील कुटिरोद्योगामधील प्रशिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती देण्यात येत होत्या.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २२