पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 परंतु नवसारी जिल्ह्यातील विणकाम उद्योग प्राचीन काळापासून प्रसिद्ध होता. नवसारी व गणदेवी येथे तयार होणाऱ्या साड्या, धोतर, बस्ता इत्यादी वस्तूंना सुरत येथील पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश कारखान्यांमध्ये मोठी मागणी होती. या कारखान्यांमधून युरोपमध्ये वस्तूंची निर्यात केली जाई. १७८८ मध्ये डॉ. होव या युरोपियन प्रवाशाने पारसी विणकराकडून विणकाम कला शिकण्यासाठी गणदेवीला भेट दिली. बडोदा सरकारच्या वतीने पाटण येथे हातमाग प्रात्यक्षिक वर्गाची स्थापना केली. सुमारे ३० सुधारित हातमाग या प्रात्यक्षिक वर्गात ठेवण्यात आले होते. या प्रात्यक्षिक वर्गाच्या माध्यमातून पाटण आणि आसपासच्या खेड्यातील विणकाम कामगारांना हातमागाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. जनतेला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका अंत्यज विणकाम कारागिराचादेखील समावेश करण्यात आला होता.
श्री चिमणाबाई स्त्री उद्योगालय

 स्त्रियांना स्वावलंबी करून त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी १९१७ मध्ये 'स्त्री उद्योगालया'ची स्थापना करण्यात आली. या उद्योगालयाने महिलांविषयीचे विविध उद्योग आणि तांत्रिक शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाची सोय करून दिली. स्त्री उद्योगालयाने भारतातील स्त्रियांचा पहिला आनंदमेळा भरविला होता. महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या गुजरातमधील या पहिल्या केंद्रात शिवणकाम,

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३२