पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बिलिमोरा आणि काचेच्या वस्तूंसाठी बडोदा अशा उद्योगांसाठी ही ठिकाणे विशेष प्रसिध्द होती. दाभोई येथे बारीक पगडी देखील तयार केली जात होती. त्याचबरोबर तेथे रंगकाम आणि कापडावर छपाई करण्याचा एक जुना उद्योग केला जात होता. दाभोई हे पितळ आणि तांब्याच्या वस्तूंसाठीदेखील प्रसिद्ध होते. युरोपमधून आयात केलेले तांबे आणि पितळ यांचा वापर करून उत्पादन घेतले जात असे. परंतु यंत्रांद्वारे बनवलेल्या स्वस्त आणि परदेशी बनावटीच्या वस्तूंची स्पर्धा करणे या देशी उद्योगांना शक्य नव्हते. यामुळे बहुतेक हस्तकलेचे उद्योग कमी झाले. आधुनिक औद्योगिकीकरणाच्या प्रभावामुळे या लघु उद्योगांना अडथळा निर्माण होऊ लागला. बडोदा संस्थानात उद्योगांच्या या पार्श्वभूमीवर १८७५ मध्ये 'सयाजीयुगा'चा आरंभ झाला.
विविध सर्वेक्षणे

 सयाजीरावांच्या औद्योगिक धोरणाचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे एकाच ठिकाणी उद्योगधंद्याचे केंद्रीकरण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती. बडोदा संस्थानच्या धोरणांची तुलना ब्रिटिश भारताशी केली असता मुंबई, कलकत्ता, मद्रास यासारखी औद्योगिक केंद्रे झपाट्याने विकसित झाली तर या केंद्रांच्या परिघातील इतर ठिकाणी उद्योगधंद्यापासून वंचित राहिली. परिणामी आज आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही मुंबईसारख्या औद्योगिक केंद्रात उभी राहिली.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ८