पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मात्र बडोदा संस्थानात विविध सर्वेक्षणांच्या आधारे उद्योगांची स्थापना केल्यामुळे उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले. परिणामी बडोद्याच्या उद्योगनगरीचे चित्र इतरांपेक्षा वेगळे दिसत आहे. महाराजांनी केलेली काही ठळक सर्वेक्षणे दिली आहेत.
१) भूवैज्ञानिक सर्वेक्षण
 उद्योगांच्या स्थापनेसाठी नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता आणि व्याप्ती तपासण्याच्या उद्देशाने १८९२ साली बडोद्यात पहिले भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. मद्रास भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे मि.ब्रूम. फ्रूट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचा अहवाल १८९८ साली प्रकाशित झाला. बड़ोदा संस्थानातील भूगर्भ साठ्यांची आर्थिक किंमत निश्चित करण्यासाठी १९०७-०८ मध्ये दुसरे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश सयाजीरावांनी दिले. हे सर्वेक्षण म्हैसूरच्या संबाशिव अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बहुतांश भूगर्भसाठे हे चुना वाळूचा दगड, संगमरवर, चिनीमाती, गेरू, कॅल्साइट व इतर खनिजांचे होते. अय्यर यांच्या सर्वेक्षणांचा नंतरच्या काळात व्यापार व उद्योग विभागाकडून विस्तार करण्यात आला.
२) वन संसाधनाचे सर्वेक्षण

 राज्याचा औद्योगिक विकासामधील वन संसाधनाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन औद्योगिक बोर्डाकडून वन संसाधनांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारे

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ९