पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझे सुदाम्याचे पोहे गोड करून घेतले व मला भेटीचा मान दिला त्याबद्दल आपले उपकार मानून, आपल्या अमृततुल्य वाणीतून उपदेशामृत श्रवणाची आम्हा सर्वांची पिपासा तृप्त करण्याबद्दल आपल्या चरणी विनंती करून महाराज, मी आपली रजा घेतो.”
महाराजा सयाजीरावांचे भाषण
 यावेळी सयाजीराव महाराजांनी केलेले भाषणसुध्दा अत्यंत मौलिक होते. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “भाऊराव पाटील व सद्गृहस्थहो, आजचे हे बोर्डिंग ज्या हेतूने रा. भाऊरावांनी ते चालविले आहे तो हेतू पाहून मला फार आनंद वाटला. आज आपल्या देशात सर्व जातीची मुले एकत्र राहतील अशा बोर्डिंगांची खरोखर फार जरूर आहे. भाऊरावांच्या या वसतिगृहासारखी आणखी पुष्कळ वसतिगृहे निघाली पाहिजेत.
मागील वाईट गोष्टी विसरा :

 २. आपली अवनती आपल्यातील कृत्रिम जातिभेदामुळेच झाली आहे. हिंदू मुसलमान हा भेदसुद्धा कृत्रिमच आहे. हिंदू मुसलमानांत पूर्वी झगडे झाले, लढाया झाल्या, पण त्या प्रसंगावशात झाल्या. पूर्वीचे द्वेष व भेद आपण आता विसरले पाहिजेत. कारण विस्मृती ही परमेश्वराने मनुष्यास एक मोठी देणगी दिलेली असून, आपण जर त्या देणगीचा योग्य उपयोग केला आणि पुष्कळशा गोष्टी विसरून गेलो तर आपले आयुष्य सुखी होऊन देशाचाही उद्धार होईल. आपले चुकते ते हे की, आपण चांगल्या गोष्टी विसरून वाईट गोष्टी मात्र उराशी बाळगून असतो.

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १४