पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



व्यापक दृष्टीची जरूरी :  ३. उदाहरणार्थ आपण धर्माची गोष्ट घेऊ. खरा धर्म कोणता हे आपण विसरून गेलो आहो आणि भलत्याच कोत्या समजुती धर्म म्हणून घट्ट धरून बसलो. आज आपल्या असमतेच्या ज्या खुळ्या कल्पना आहेत तो खरा धर्म आहे काय ? खरा धर्म म्हणजे समतेचा व भूतदयेचा आहे. हे सद्गुण ज्यांत नसतील तो खरा धर्म नव्हे. तुम्ही हिंदुस्थानबाहेरच्या जगाकडे पाहा, म्हणजे तुमची दृष्टी विस्तृत होऊन खरा धर्म कोणता व आज आपण समजतो व पाळतो तो खरा धर्म कसा नाही, हे तुम्हास समजून येईल. आमच्यातल्या ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी परदेशांतून प्रवास करावा. प्रवासाने दृष्टी, बुद्धी व कल्पना व्यापक होतात, शिवाय आपल्या वेडगळ धार्मिक समजुतींमुळे हिंदुस्थानचे जगात कसे हसे झाले आहे व आपल्याला जगात कोणता दर्जा प्राप्त झाला आहे हे दिसेल.
मनुष्यप्राणी हा सवयीचा गुलाम असतो :

 ४. मनुष्यप्राणी हा सवयीचा गुलाम असतो. सवयीने ज्या गोष्टी व कल्पना अंगवळणी पडतात त्याच आपण पुढे ईश्वरनिर्मित मानू लागतो आणि तोच पुढे धर्म समजला जातो. पण हे अगदी चूकीचे आहे. उदाहरणार्थ अंत्यजांचीच गोष्ट घ्या. ही गोष्ट केवळ सवयीने अस्तित्वात आली आहे, पण अंत्यज किंवा चातुर्वर्ण्य हे ईश्वरनिर्मित आहे, परंतु निव्वळ सवयीने अंगवळणी पडलेल्या आचारांना व कल्पनांना धर्म समजू नका. इतिहासाचे अध्ययन

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १५