पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही नाही. कारण सुस्थितीत असलेल्या मनुष्याविषयी प्रेम व सहानुभूती बाळगून त्याजबद्दल आपले कर्तव्य काय हे समजले पाहिजे, असे जो करील तोच खरा श्रीमंत मी तरी स्वतः पुढे हेच ध्येय ठेवले असून त्याप्रमाणे गेली चाळीस वर्षे वागण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. अगदी शिकण्याच्या जिज्ञासू बुद्धीने माझ्या गरीब रयतेत सारखी मिळून मिसळून वागलो. मी तिच्या अडचणी आणि गरजा समक्ष समजावून घेतल्या. त्यायोगे माझा पुष्कळ फायदा झाला. मी पुष्कळ नवीन गोष्टी शिकलो. रयतेच्या अडचणी दूर करून तिची उन्नती करणे हे माझे मूळ कर्तव्य आहे, याची मला जाणीवही याच माझ्या मोकळेपणाने मिसळल्याने झाली व लोकांच्या अडचणींची प्रत्यक्ष कल्पना मला झाल्यामुळे त्या दूर करण्याचे उपाय योजिले आणि त्यात मला यशही मिळाले हे आपणास माहीत आहेच.
विद्यार्थ्यांनी स्पार्टन लोकांप्रमाणे शरीरसामर्थ्य वाढविले पाहिजे :

 १०. मुलांना या वसतिगृहात साधेपणाचे जे शिक्षण मिळते ते फार चांगले आहे.त्यांनी स्पार्टन लोकांप्रमाणे काटक व मजबूत होऊन शरीरसामर्थ्य वाढविले पाहिजे. मात्र अभ्यास किंवा इतर श्रम करताना त्यांच्या शारीरिक शक्तीवर विशेष आघात होऊन पुढील आयुष्यक्रम आक्रमिण्यास ते निरंतरचे नालायक न होतील या गोष्टींकडेही चालकांनी विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १९