पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल'
 हायस्कूलची पायाभरणी होण्याअगोदरच महाराजांचे निधन झाले. सयाजीरावांचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्मारक म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात या शाळेचे वेगळे महत्त्व आहे. विशेष म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा आत्मा असणाऱ्या 'कमवा आणि शिका' योजनेचा आरंभ या शाळेच्या स्थापनेबरोबरच झाला. ३ डिसेंबर १९३९ रोजी भाऊरावांनी साताऱ्यात 'महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल' या निवासी माध्यमिक विद्यालय आणि ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ सयाजीरावांचे नातू आणि उत्तराधिकारी प्रतापसिंह यांच्या हस्ते केला. विशेष म्हणजे या समारंभाचे पौरोहित्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले तर संध्याकाळी गाडगे महाराजांनी कीर्तन केले. या समारंभाला महाराष्ट्रातील अनेक संस्थानिक व त्यांचे सरदार उपस्थित होते.

 भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचे 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' ब्रीदवाक्य असणारे हे पहिले निवासी माध्यमिक विद्यालय २० जून १९४० रोजी सुरू झाले. सयाजीरावांनी केलेल्या अस्पृश्योद्धार आणि शैक्षणिक कामाचे स्मारक म्हणून भाऊरावांनी या माध्यमिक विद्यालयाला 'महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल' असे नाव दिले. सयाजीराव महाराजांचे व्यक्तिमत्त्व किती अनुकरणीय होते आणि भाऊरावांनी त्यांचा आदर्श का स्वीकारला हे कडियाळ

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २५