पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कर्मवीरांची प्रेरणा सयाजीराव होते याचा आणखी एक पुरावा म्हणजे १० ऑक्टोबर १९४० रोजी भाऊरावांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. मसाणी यांच्या हस्ते 'सौ. लक्ष्मीबाई पाटील फिरते वाचनालय व ग्रंथालय' सुरू केले. या फिरत्या वाचनालयाचीही प्रेरणा सयाजीरावांनी १९१० मध्ये 'सयाजीवैभव' या नावाने बडोद्यात सुरू केलेला फिरत्या ग्रंथालयाचा उपक्रम होता. स्कॉटलंडनंतर बडोद्यातील हा प्रयोग जगातील दुसरा प्रयोग मानला जातो.

 शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणेच्या कामाचे एक ऊर्जाकेंद्र ज्याप्रमाणे बडोदा होते त्याप्रमाणे भाऊराव पाटलांच्या कामाचेही प्रेरणाकेंद्र बडोदा होते. कारण ज्याप्रमाणे कर्मवीरांवर शाहू महाराजांचा प्रभाव होता त्याचप्रमाणे कोल्हापुरात विद्यार्थी असताना १९०८ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भाषणाने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या भावी कार्याला विधायक दिशा दिली होती. त्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अस्पृश्यांच्या उद्धाराच्या कार्याची प्रेरणा सयाजीराव होते. या संदर्भात विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात,“एकंदरीत या थोर पुरुषाच्या अंतकरणात या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हे माझ्या ध्यानात येऊन चुकले. इतकेच नव्हे तर या महत्त्वाच्या विषयासंबंधी माझ्या स्वतःच्या विचारांना नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्मसमाजाच्या अखिल भारतातील माझ्या प्रचारकार्याबरोबर या लोकांची निरनिराळ्या प्रांतातील स्थिती स्वतः डोळ्याने नीट निरखून आजमाविण्याची मला प्रेरणा झाली. "

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २८