पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयार झालेले पी.सी.पाटील जो कबुलीजबाब देतात तो वरील विश्लेषणाला भक्कम आधार पुरवतो. पाटील म्हणतात, “मराठा समाजांत शिक्षणाच्या वृद्धीसाठी आपण जे अत्यंत बहुमोल परिश्रम घेत आहात त्याबद्दल मराठा समाज अत्यंत ऋणी राहील यात शंका नाही. माझ्या वेळी कॉलेजात शिक्षण घेणारे मराठे चार पाचच होते, पण आता ती संख्या ३०० वर गेली आहे. याचे सर्व श्रेय महाराज आपणाला आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही.” एकूणच महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात सयाजीरावांची भूमिका किती महत्त्वाची होती हे पी. सी. पाटलांच्या वरील विधानातून स्पष्ट होते.

 खुद्द कर्मवीरांच्या शब्दात सांगायचे झाले तर “१९०६ साली मी आपले अंत्यजोद्धारासंबंधी भाषण वाचले व त्या भाषणाने माझ्या मनामध्ये अतिशय खळबळ उडवून दिली. मी तेव्हाच निश्चय केला की, श्रीमंत महाराजांनी दर्शविलेल्या विचाराप्रमाणे व व्यक्त केलेल्या ध्येयास अनुसरून आजन्म प्रयत्न करावयाचा. उपजीविकेस साधन म्हणून नोकरी करून जे काही पैसे शिल्लक राहतील ते हीन मानलेल्या लोकांस ज्ञान देऊन त्यांना पुढे आणण्यामध्ये खर्च करावयाचे. या हेतूने मी काही दिवस नोकरीही केली; परंतु त्या व्यवसायामुळे माझे ध्येय बरोबर मला गाठता येईना, म्हणून नोकरीवरही मी तिलांजली दिली व प्रस्तुतचे कार्य अंगावर घेतले."

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ३०