पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १) विद्येचा प्रसार करणे.
 २) त्यांच्यामध्ये असलेल्या वाईट चालीरीती सुधारण्याविषयी झटणे.
 ३) त्यांचे आर्थिक, राजकीय, इतर हितसंबंध व हक्क यांचा पुरस्कार करण्यास झटणे.
 ४) मागासलेल्या निरनिराळ्या जातीत परस्परांविषयी समता, प्रेम व ऐक्यभाव या वृत्ती वृद्धिंगत होतील असे करण्यास झटणे.

 सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे १८९० ते १८९५ अशी ५ वर्षे या संस्थेचे अध्यक्ष होते. 'मराठा ऐक्येच्छू सभा' ही सामान्य जनतेच्या उद्धारासाठी सत्यशोधक समाजानंतर निघालेली मुंबईतील दुसरी मोठी संस्था होती. या संस्थेच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी १७ जून १८८८ रोजी 'ब्राह्मण सभा' ही केवळ एका जातीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारी मुंबईतील पहिली संस्था स्थापन झाल्याचे निरीक्षण धनंजय कीरांनी नोंदवले आहे. मराठा ऐक्येच्छू सभेच्या वतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जात असे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी लागणारे तेल पुरवण्याचे काम कित्येक वर्षे पिरजीभाई महंमद हा गृहस्थ करत असे. शिवजयंतीनिमित्त या संस्थेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने आणि कीर्तनांचे आयोजन केले जाई. गरीब मुलांना शाळेची पुस्तके, शिष्यवृत्ती इ. च्या माध्यमातून शाळेत जाण्यासाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने जुलै

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १