पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८९९ मध्ये मराठा ऐक्येच्छू सभेतर्फे 'विद्याप्रसारक मंडळी' नावाची उपसंस्था स्थापन करण्यात आली. केळुसकर या 'विद्याप्रसारक मंडळी' चे कार्यवाह होते.
मराठा रिलीफ कमिटी
 ऑगस्ट १८९३ मध्ये मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली. या दंगलीमध्ये दोन्ही धर्माचे अनेक गरीब लोक मारले गेले. मृत व्यक्तींच्या निराधार बायका-मुलांना मदत व्हावी व दोन्ही समाजात सलोखा निर्माण व्हावा या हेतूने २२ ऑगस्ट १८९४ रोजी 'मराठा रिलीफ कमिटी'ची स्थापना करण्यात आली. या कमिटीचे प्रमुख कार्यवाह म्हणून केळुसकरांची निवड करण्यात आली. या कमिटीच्या कार्यात केळुसकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मराठा प्रॉव्हिडंट फंड
 आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी गोविंद कृष्णाजी दळवी यांनी सी. के. बोले यांच्या साहाय्याने फेब्रुवारी १८९५ मध्ये मराठा प्रॉव्हिडंट फंड संस्थेची स्थापना केली. संस्थेचे संस्थापक गोविंद दळवी हे विल्सन महाविद्यालयात शिकत असतानाच या संस्थेच्या स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. तेव्हापासून केळुसकर त्यांचे मार्गदर्शक आणि सल्लागार होते. पुढे केळुसकरांनी या संस्थेचे संचालकपद देखील भूषवले.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १५