पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आध्यात्मिक ज्ञानरत्नावली मासिक
 केळुसकरांचे स्नेही लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी १८९३ मध्ये 'आध्यात्मिक ज्ञानरत्नावली' नावाचे मासिक सुरू केले. नागवेकरांनी या मासिकाच्या संपादकपदी कृष्णराव अर्जुन केळुसकरांची निवड केली. केळुसकर गुरुजींनी आध्यात्मिक ज्ञानरत्नावलीमध्ये वेदांतावरील ग्रंथांची चिकित्सा करणारे अनेक लेख लिहिले.
इस्त्रायल साप्ताहिक
 इस्रायली शाळेतील केळुसकरांचे वरिष्ठ हाईम साम्युएल केहिमकर हे ‘इस्त्राएल' नावाचे साप्ताहिक चालवत. केहिमकर यांच्या ज्येष्ठ मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी केळुसकरांवर संपादकपदाची जबाबदारी सोपवली. लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'ज्यूईश क्रॉनिकल' नावाच्या इंग्लिश साप्ताहिकातील लेखांचे मराठी भाषांतर केळुसकर या साप्ताहिकात प्रसिद्ध करत.
जगद्वृत्त साप्ताहिक
 तत्कालीन मुंबई सरकारची परिपत्रके आणि निवेदने मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी 'अॅडव्होकेट ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकाचे संपादक गॉर्डन यांनी सरकारी मदतीच्या साहाय्याने ‘जगद्वृत्त’ हे सोळा पानी साप्ताहिक सुरू केले. जगद्वृत्तचे संपादक केळुसकर होते. मुंबई सरकार या साप्ताहिकाच्या १५०० ते २००० प्रती विकत घेऊन सार्वजनिक संस्थांना मोफत वाटत असे.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १७