पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘जगद्वृत्त' साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करत असताना केळुसकरांनी बहुजन समाजातील कर्त्या पुरुषांची जनतेला ओळख व्हावी आणि त्यांच्या चरित्रातून तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने अनेक परिचयात्मक लेख लिहिले. त्यांचे हे लेखन समाजातील अनेक सुशिक्षितांना पटले नाही. याच दरम्यान ब्रिटिश अधिकारी जॅक्सन याची काही भारतीय क्रांतिकारकांनी हत्या केली. या प्रकरणात भूमिका मांडताना केळुसकरांनी अकारण ब्राह्मणांना दोष दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यावेळी जगद्वृत्त साप्ताहिकाचे संस्थापक गॉर्डन यांनी केळुसकरांना ‘आपले वृत्तपत्र लोकांची नीती सुधारण्यासाठी नसून त्यांना केवळ वर्तमान कळविण्यासाठी आहे' अशा शब्दात समज दिली. त्यामुळे १९१४ मध्ये केळुसकरांनी जगद्वृत्त साप्ताहिकाच्या संपादकपदाचा राजीनामा दिला.
 केळुसकरांनी आपली 'नीतिबोधमाला' नावाची लेखमाला ‘जगद्वृत्त' साप्ताहिकातून क्रमशः प्रकाशित केली. लहान मुलांना लहान बोधपर गोष्टी सांगून सदाचाराचा उपदेश करण्याच्या उद्देशाने केळुसकरांनी ही नीतिबोधमाला लिहिली होती. पुढे ती पुस्तकरूपाने ४ सुमनांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यातील पहिले सुमन १९१४ साली प्रकाशित करण्यात आले. तर उर्वरित तीन सुमने १९१६ मध्ये प्रसिद्ध झाली. ही तीन सुमने केळुसकरांनी कृतज्ञतापूर्वक सयाजीराव महाराजांना अर्पण केली होती. ही ‘नीतिबोधमाला' लहान मुलांसाठी होती. जानेवारी १९२९ मध्ये केळुसकरांनी 'गोमंतक मराठा समाजा'च्या 'समाजसुधारक' या मासिकाचे पहिले संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १८