पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुबोधपत्रिका
 १८९०-९१ दरम्यान केळुसकरांनी सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या विवाह संमती वय विधेयकाच्या बाजूने 'सुबोधपत्रिकेत दोन लेख लिहिले. या लेखात त्यांनी केलेली मांडणी बिनतोड होती. या लेखांमध्ये केळुसकरांच्या आरोग्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांच्या सूक्ष्म अभ्यासाची झलक पाहायला मिळाली. या लेखांबद्दल सयाजीराव महाराजांनी केळुसकरांचे कौतुक केले होते.
 सुबोधपत्रिकेच्या नोव्हेंबर १८९१ च्या अंकात केळुसकरांनी लिहिलेला 'पाऊस पाडता येईल काय?" हा लेख त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन अधोरेखित करतो. अमेरिकेत १८७४ पासून चाललेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा उल्लेख करून या लेखात केळुसकर लिहितात, “प्रथमतः पाऊस पाडण्याचा हा कृत्रिम उपाय निश्चित झाला पाहिजे आणि जो तसा लवकरच सत्यशोधकांच्या परिश्रमाने होवो अशी आमची मनापासून इच्छा आहे.” केळुसकरांनी सत्यशोधकांना दिलेला हा सल्ला सत्यशोधकांनी ऐकला असता तर आजची सत्यशोधक - ब्राह्मणेतर चळवळ संकुचित झाली नसती. त्यांची ही मागणी भारतातील विज्ञान साक्षरता चळवळीची सुरुवात म्हणावी लागेल. कारण कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची सूचना करणारे केळुसकर पहिले भारतीय ठरतात.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १९