पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कृत उपनिषदे मिळविण्यासाठी प्रयत्नदेखील करत होते. तोपर्यंत त्यांना विद्याधिकाऱ्यांकडून हुकूम आला की,"महाराज सरकारांनी श्री शंकर मोरो रानडे यांना पहिला व्हाल्यूम भाषांतर करण्यास दिला आहे. यास्तव तुम्ही पंधराव्या व्हाल्यूमातील उपनिषदांचे तेवढे भाषांतर करावे.” अर्थातच ब्राम्हणी विद्वानांनी ते काम केळुसकरांकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. कारण एका शूद्राने उपनिषदांचे भाषांतर करणे त्यांना धर्मद्रोह वाटत होता. बडोद्यातील ब्राह्मण विद्वानांना हे आवडले नाही. त्यामुळे शंकर मोरो रानडे यांनी महाराजांना भेटून “मी सध्या रिकामा आहे. हे उपनिषदाचे काम मला सांगावे" असा आग्रह केल्यामुळे महाराजांनी उपनिषदाचे अर्धे काम त्यांना दिले. परिणामी सात उपनिषदांचे भाषांतर केळुसकरांनी केले.
 केळुसकरांनी मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे भाषांतर केले. विशेष म्हणजे या अनुवादात त्यांनी मॅक्स मुल्लरचा कोठेही आधार घेतला नाही. फक्त उपनिषदांवरील शांकरभाष्यासाठी मात्र त्यांनी मॅक्स मुल्लरच्या ग्रंथाची मदत घेतली. केळुसकरांनी ‘कठ’, ‘मुण्डक’, ‘तैत्तिरीय', 'बृहदारण्यक', 'श्वेताश्वेतर', 'प्रश्न' आणि 'मैत्रायणीय' अशा सात उपनिषदांचे भाषांतर केले. हे भाषांतरही परीक्षण समितीने उत्कृष्ट ठरवले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत उपनिषदांचे भाषांतर करणारे केळुसकर हे पहिले ब्राम्हणेतर ठरतात. केळुसकरांचे मोल मांडताना डॉ. सदानंद मोरे लिहितात, “केळुसकर व शिंदे या दोन गुरुवर्यांचा विसर हे

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २५