पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

या प्रकरणामुळे दुखावलेल्या गांगनाईकांनी केळुसकरांकडून सर्व कामे काढून घेण्याचा आणि त्यांना नवीन कामे मिळू न देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील एक उदाहरण येथे विचारात घ्यावे लागेल. सयाजीराव महाराजांनी केळुसकरांना मॅक्समुल्लरने भाषांतर केलेल्या आणि 'सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट' या ग्रंथात प्रकाशित झालेल्या उपनिषदांचे भाषांतर करण्याची आज्ञा केली. त्यानुसार केळुसकरांनी मॅक्स मुल्लरच्या ग्रंथाऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन उपनिषदांचे भाषांतर केले. पहिल्या उपनिषदाचे भाषांतर झाल्यानंतर केळुसकरांनी ते परीक्षण समितीकडे अभिप्रायासाठी पाठवले. परंतु बरेच दिवस केळुसकरांना या संदर्भात कोणतेही उत्तर मिळाले नाही. याउलट केळुसकरांचे काम पसंत न पडल्यामुळे त्यांच्याकडील सर्व काम शंकर मोरो रानडेंना देण्यात आल्याची अफवा संपूर्ण बडोद्यात पसरली.

यासंदर्भात केळुसकरांनी सयाजीराव महाराजांची मुंबईत भेट घेतली. तो प्रसंग सांगताना केळुसकर लिहितात, “महाराज सरकारची स्वारी मुंबईस आली. तेव्हा त्यांना ' गौतमबुद्धाचे चरित्र' नजर करण्याच्या निमित्ताने भेटण्याची खटपट केली; परंतु महाराजांच्या स्वारी कामदारांनी मला असे सांगितले की, महाराज राणीसरकारच्या तब्येती कारणे फिकिरीत आहेत, ते तुम्हाला भेटणार नाहीत. तेव्हा मी मुद्दाम बांधवलेली गौतमबुद्धाची प्रत कसेही करून महाराजांना आज अर्पण करून आपल्या तक्रारीचा

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २८