पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेख त्यातून पाठवावा, असे मनात आणून मी महाराज ज्या बंगल्यात उतरले होते, त्या बंगल्याच्या आवारापाशी गेलो. तेव्हा तेथल्या पहाऱ्यावरच्या इसमाने मला सांगितले की, दरवाजापाशी उभे राहू नका, बाजूला उभे राहा. तेव्हा मी म्हटले की, मी तुमच्या देवडीपाशी एका बाजूला उभे राहतो. तसे करावयास मला त्याने परवानगी दिली आणि दरवाजाच्या आत येऊन देवडीपाशी उभा राहिलो.
 महाराज त्यावेळी बाहेर जाण्याच्या तयारीत होते. आवारात दोन घोड्यांची गाडी येऊन तिष्ठत होती. मी देवडीपाशी उभा आहे हे महाराजांनी माडीवरून उतरताना पाहिले, हुजूर कामदाराला मला काय पाहिजे ते विचारावयास पाठविले. ज्याने मला भेटी विषयी नकार सांगितला होता तोच हा मनुष्य होता. मला महाराजांना क्षणभर भेटावयाचे आहे, असे सांगितल्यावरून त्याला तसे महाराजांना सांगावे लागले. महाराजांनी मला घेऊन येण्याविषयी सांगितले आणि मी पुढे जाऊन महाराज दारात उभे होते, त्यांनी मला मोठ्या प्रेमाने हाक मारून येण्याचे कारण विचारले. तेव्हा मी जवळचे पुस्तक पुढे केले आणि म्हटले सरकारांना संक्रांतीचे हे तिळगूळ आणले आहेत. महाराजांनी मोठ्याने हसून म्हटले हे तुमचे तिळगूळ अतिशयित गोड असले पाहिजेत. नंतर मला आत एका दालनात बोलावून नेऊन बसविले आणि ते पुस्तक उघडून पाहिले. महाराजांना बुद्धाविषयी बरीच माहिती होती आणि मराठी भाषेत त्याचे चरित्र व्हावे अशी इच्छा होती. तेव्हा अर्थात

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २९