पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या पुस्तकाने त्यांना आनंद वाटून त्यांनी मला शाबासकी दिली आणि पुस्तक तयार करण्यास कोणकोणत्या ग्रंथांचा आधार घेतला म्हणून विचारले. याप्रमाणे त्या पुस्तकाविषयी थोडे बोलणे झाल्यावर मी माझी तक्रार महाराजांना निवेदन केली. मी म्हटले सरकार माझे काम कमिटीला नापसंत झाल्याची दाट वदंता सगळ्या बडोदे शहरात पसरली असता तिचा काही एक मागमूस मला आज एक महिना विद्याधिकाऱ्यांकडून काहीच कळू नये, हे कसे? हे ऐकताच त्यांनी आपल्या स्वारी कामदारांना सांगितले की, या बाबतीत विद्याधिकाऱ्यांना ताबडतोब पत्र लिहून खरा प्रकार काय आहे, तो मला कळविण्यास सांगावे.”
 केळुसकरांनी मुंबईत सयाजीराव महाराजांची भेट घेतल्यानंतर विद्याधिकाऱ्यांनी केळुसकरांना पत्र पाठवले. या पत्रासोबत परीक्षण समितीच्या पाचही सदस्यांचे केळुसकरांच्या पुस्तकावरील अभिप्राय जोडण्यात आले होते. परीक्षण समिती सदस्यांनी केळुसकरांच्या ग्रंथाची सुरुवातीची केवळ चार-पाच पाने वाचून अभिप्राय लिहिले होते. पाचपैकी तीन सदस्यांचे मत केळुसकरांच्या बाजूने तर दोघांचे मत विरोधात होते. विरोधी मत देणाऱ्यांमध्ये शंकर मोरो रानडे व आठल्ये यांचा समावेश होता. रानडे हे गांगनाईक यांचे जिव्हाळ्याचे मित्र होते. त्यामुळे केळुसकरांच्या विरोधात मत देऊन त्यांचे काम काढून 'घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु केळुसकर हार मानणारे नव्हते. या पाचही सदस्यांची मते समोरासमोर ठेवून केळुसकरांनी बडोद्याच्या

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३०