पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुद्दे खोडून महाराजांनी त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. माफी मागताना स्वामी हंसस्वरूप म्हणाले, 'महाराज,आपलं म्हणणं मला मान्य आहे. आपल्याला विरोध करण्याची माझ्यासारख्याची योग्यता नाही.' स्वामी हंसस्वरूप ही सामान्य आसामी नव्हती. त्यांची कीर्ती संपूर्ण भारतात हिंदू धर्माचे अधिकारी भाष्यकार अशी होती. यातून महाराजांच्या धर्मचिकित्सेवरील अधिकाराची प्रचिती येते.
 महाराजांच्या या भाषणावर वर्तमानपत्रात बरीच टीका झाली. यासंदर्भात १ ऑक्टोबर १९०१ रोजी टिळकांनी केसरीत 'श्री गायकवाड सरकार यांचा वेदांत' हा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात टिळकांनी वरील भूमिका मांडली होती. पुढे केळुसकरांच्या ग्रंथानंतर १३ वर्षांनी १९९५ मध्ये टिळकांचा 'गीतारहस्य' ग्रंथ प्रकाशित झाला. गीतेला वेदांतातील नीतिशास्त्र मानणाऱ्या टिळकांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथात गीतेचा नवकर्मपर व प्रवृत्तीपर अर्थ लावला आहे. गीतेवरील ग्रंथांसंदर्भात भाष्य करताना टिळक लिहितात, “गीतेवर जी भाष्ये व टीका सध्या उपलब्ध आहेत त्या निरनिराळे सांप्रदायिक आचार्य व त्यांचे अनुयायी यांच्या आहेत व त्यामुळे ज्याने त्याने गीतार्थ आपल्या सांप्रदायास अनुकूल होईल अशा रीतीने निरूपिला आहे. " टिळकांच्या या भाष्याच्या पार्श्वभूमीवर 'गीतारहस्य' ग्रंथासंदर्भात सयाजीराव महाराजांनी व्यक्त केलेले मत समजून घेणे उद्बोधक ठरते.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३५