पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३० जानेवारी १९२८ रोजी सदाशिव विनायक बापट यांनी त्यांच्या 'लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका' या ग्रंथासाठी बडोद्यात सयाजीरावांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बापटांनी सयाजीरावांना टिळकांच्या कार्याविषयी त्यांचे मत विचारले असता सयाजीरावांनी टिळकांच्या 'गीतारहस्य' ग्रंथाविषयीचे मत मांडले. सयाजीराव म्हणतात, “टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ चांगला लिहिला आहे, यांत शंका नाही. तरी पण त्यांतील जातिभेदाविषयी त्यांचे विचार आम्हास मान्य नाहींत. त्यांनी या बाबतीत आपले प्रगतीपर धोरण ठेविले असे आम्हास वाटत नाही. राष्ट्रीय प्रगतीमध्ये सामाजिक प्रगतीचा अंतर्भाव होतो. आपली गृहनीती व समाजनीती पायाशुद्ध, बिनभेदभाव ठेवणारी अशी श्रेष्ठ प्रकारची झाल्याशिवाय राष्ट्रोन्नती होणे शक्य नाही व कदाचित झाल्यास ती फार वेळ टिकावयाची नाही. उदाहरणार्थ मराठ्यांचे राज्य.” टिळकांच्या गीतारहस्याची मर्यादा सांगणारे व एवढे परखड भाष्य करणारे सयाजीराव एकमेव आहेत.
 याउलट सयाजीरावांनी केळुसकरांच्या 'श्रीमद्भगवगीता सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक' या ग्रंथावर उत्कृष्ट अभिप्राय देताना " ही टीका गीतेवरील एकंदर टीकांहून श्रेष्ठ" असल्याचे मत नोंदवले आहे. विशेष बाब म्हणजे महाराज आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केळुसकरांचा हा ग्रंथ भेट देऊन आवर्जून वाचण्यास सांगत होते. यातच टिळकांच्या तुलनेत केळुसकरांच्या कामाचे अनन्यत्व लपले आहे. पुढे १९३० मध्ये

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३६