पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गांगनाईक यांनी केळुसकरांचा हा संशोधनात्मक लेख स्वतःच्या नावाने छापून महाराजा सयाजीरावांकडे पाठविला. महाराजांना हा लेख खूप आवडला. या लेखाबद्दल गांगनाईक यांना पारितोषिकही देण्यात आले. याशिवाय 'फ्रेंच पाकशास्त्र' या विषयावरील दोन ग्रंथांचे मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी सयाजीरावांनी गांगनाईक यांच्यावर सोपविली होती. या कामातही केळुसकरांनी गांगनाईकांना मदत केली. या ग्रंथांच्या भाषांतरास गांगनाईक यांना अधिक काळ लागल्यामुळे सयाजीरावांची त्यांच्यावर नाराजीची वेळ आली होती. परंतु पुन्हा एकदा केळुसकरांनी त्यांना मदत केल्यामुळे त्यांच्यावरील नाराजीची वेळ टळली.
धर्मानंद कोसंबी : ऋण नाकारणारे अनुयायी
 केळुसकरांचे १८९८ मध्ये प्रकाशित झालेले फक्त मराठीतीलच नव्हे तर कोणत्याही भारतीय भाषेतील पहिले बुद्ध चरित्र वाचून धर्मानंद कोसंबी, डॉ. आनंदराव नायर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वजण बुद्धाशी जोडले गेले. केळुसकरांचे मराठी संस्कृतीला हे फार मोठे योगदान आहे. बुद्धाच्या समतावादी विचाराशी सयाजीरावांचे अगदी सुरुवातीपासूनचे नाते होते. बुद्ध साहित्याला बडोद्यातील साहित्य प्रकाशनात महाराजांनी अग्रक्रम दिला होता. केळुसकरलिखित 'गौतमबुद्धाचे चरित्र' संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३८