पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मवृत्तात नोंदवतात. पुढे समग्र बौद्ध वाङ्मयाचे अवलोकन केल्यावर धर्मानंद कोसंबींनी केळुसकरांच्या बुद्ध चरित्राविषयी मतभेद व्यक्त केले. केळुसकरांची वैज्ञानिक दृष्टी विचारात घेता हे मतभेद बौद्धिक नव्हते तर बुद्ध परंपरा आधुनिक भारतात आपल्यापासून सुरू होते हे ठसवण्याचा एक 'कोता' प्रयत्न होता असेच आज म्हणावे लागते.
 याउलट गोविंद काणे यांचे बंधू डॉ. काणे व विनायकराव ओक यांनी केळुसकरांच्या बुद्धचरित्राची प्रशंसा केली. केळुसकरांचे हे बुद्धाचे चरित्र वाचूनच डॉ. आनंदराव नायर यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि त्या धर्माची दीक्षा घेतली. एका सभेत बोलताना डॉ. नायर यांनी 'केळुसकरकृत बुद्ध चरित्रापासून आपण स्फूर्ती घेऊन बौद्ध धर्माच्या प्रचारास वाहून घेतल्याचे स्पष्ट केले होते.
केळुसकर आणि वासुदेव बिर्जे
 कृष्णराव केळुसकर आणि सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल वासुदेव लिंगोजी बिर्जे यांचा विशेष स्नेह होता. केळुसकर शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्यासाठी संदर्भ शोधत असताना त्यांची पत्नी आजारी पडली. त्यामुळे ते आपल्या गावी गेले. काही दिवसांनी केळुसकर स्वतःच तापाने प्रचंड आजारी पडले. तापाचा आजार वाढल्यामुळे या दुखण्यातच आपला अंत होण्याची भीती केळुसकरांना वाटू लागली. तेव्हा शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी काढलेल्या टिपा बडोद्यास वासुदेव

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४