पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या शिवरायांच्या पहिल्या चरित्राचे स्वागत अशा पद्धतीने त्यावेळी झाले. महाराष्ट्रातील ब्राह्मण इतिहासकारांनी तर या चरित्राची 'भ्रूणहत्या'च केली. परंतु ब्राह्मणी दबावाला शरण जाऊन या ऐतिहासिक चरित्राकडे एक- दोन अपवाद वगळता बहुजन इतिहासकारांनीसुद्धा आजअखेर दुर्लक्ष केले. दुर्दैवाने गेल्या ६० वर्षात बहुजनांत एवढे लेखक- संशोधक निर्माण होऊनसुद्धा शिवरायांचे एकही अधिकृत चरित्र लिहिले गेले नाही. ही बाब गंभीर परंतु बोध घेण्यासारखी आहे.
दिवाण धामणस्कर आणि केळुसकर
 मामा परमानंद यांच्या शिफारशीवरून १८८४ मध्ये सयाजीरावांनी सत्यशोधकी विचारांचे महत्त्वाचे व्यक्ती असलेले रामचंद्र विठोबा धामणस्कर यांना ब्रिटिश सरकारच्या नोकरीतून बोलावून घेऊन बडोद्यात नायब सुभे या पदावर त्यांची नेमणूक केली. पुढे १९०१ ते १९०४ या कालावधीत धामणस्करांनी बडोद्याच्या दिवाणपदाची जबाबदारी पार पाडली. धामणस्कर केळुसकरांचे खास मित्र होते. धामणस्करांनीच केळुसकरांची सयाजीरावांशी भेट घालून दिली होती. यासंदर्भात केळुसकर लिहितात, “त्या दयाळू साहेबांनी महाराजांकडे माझ्या योग्यतेसंबंधाने बोलून मला बारा ग्रंथांपैकी एक देण्याविषयी भलावण केली. हा त्यांचा माझ्यावर मोठा उपकार झाला आणि ग्रंथ लिहिण्याचे काम ब्राह्मणांनाच चांगले येते असा जरी सामान्यत: समज होता तरी हे काम दिले आणि माझी

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४२