पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची भेट घेतली. या भेटीत केळुसकरांनी शिवचरित्राच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशनातील आर्थिक अडचण खासेरावांना सांगितली.
 खासेरावांनी लक्ष घालून हा प्रश्न कसा सोडवला हे केळुसकरांच्याच शब्दात समजून घेणे उपयुक्त ठरेल. केळुसकर म्हणतात, “काही इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्यांनी मला विचारले, 'तुम्ही बंगालच्या यदुनाथ सरकारांना शिवाजी संबंधाची काही माहिती का देत नाही? ते इंग्रजीमध्ये शिवाजीचे चरित्र लिहीत आहेत.' मी म्हटले, 'आमच्या राष्ट्रवीराचे चरित्र ते काय लिहिणार? आम्हीच ते लिहिले पाहिजे.' त्यावर ते म्हणाले, 'आमच्याकडे त्यांच्याइतके चांगले लिहिणारा कोण आहे?' मी म्हटले, 'मी मराठीत लिहिलेले चरित्र आपल्याला पसंत आहे काय? त्याचे इंग्रजी भाषांतर मी एका पंडितांकडून करविले असून ते एका मोठ्या इंग्रज विद्वान गृहस्थाकडून तपासविले आहे. ते छापावयास द्रव्य नाही म्हणून ते पडून राहिले आहे.' खासेराव जाधवांनी ते पाहावयास मागितले. त्यावरून मी त्याचा शेवटला भाग त्यांना वाचावयास दिला. तो त्यांना फारच आवडला आणि त्यांनी असे वचन दिले की, हा तुमचा उत्तम ग्रंथ छापावयाला लागणारे द्रव्य मी अवश्य मिळवून देतो. हे त्यांचे वचन त्यांनी लवकरच पुरे केले. त्यानंतर ते ग्वाल्हेरीस गेले. तेथे त्यांनी माझ्या ग्रंथाची गोष्ट श्रीमंत महाराज खासेसाहेब पवार व श्रीमंत सरदार शितोळे साहेब यांच्याकडे काढली आणि तो

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४४