पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छापावण्यासाठी द्रव्य मागितले. ते श्री. सरदार शितोळे साहेबांनी देण्याचे अभिवचन देऊन मला कर्जाऊ म्हणून साडेपाच हजार रुपये रीतीप्रमाणे दस्तऐवज लिहून घेऊन दिले." या चर्चेतून पुन्हा एकदा बडोदा केळुसकरांच्या मदतीला आला हे स्पष्ट होते. खासेरावांनी लक्ष घातल्यामुळे कमी वेळात आणि कमी त्रासात शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजी भाषेत गेले. हे खासेरावांचे काम ऐतिहासिक असले तरी पुन्हा दुर्लक्षित आहे.
केळुसकर आणि बाबासाहेब
 केळुसकरांचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील योगदान यावर स्वतंत्रपणे संशोधन होणे गरजेचे आहे. कारण तीन भूमिकेतून केळुसकर बाबासाहेबांसाठी महत्त्वाचे ठरतात. पहिला मुद्दा म्हणजे बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर सी. के. बोले यांच्या हस्ते केळुसकरांनी बाबासाहेबांचा सत्कार घडवून आणला. त्यावेळी केळुसकरांनी स्वलिखित बुद्ध चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. या बुद्ध चरित्राने बाबासाहेबांच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातील दुसरा मुद्दा असा की, याचवर्षी दामोदर यंदे यांच्यामार्फत केळुसकरांनी बाबासाहेबांना सयाजीरावांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. जी पुढे बाबासाहेबांना कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत घेऊन गेली. यातून बाबासाहेबांमधील विद्वान नेता घडला.
 तिसरा मुद्दा म्हणजे १९१८ मध्ये बाबासाहेब ज्यावेळी बडोद्यातून परत आले तेव्हा ते सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४५