पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आर्थिक मदत करण्यासाठी केळुसकरांच्या नावाने लिहिलेले पत्र समग्र आंबेडकर वाङ्मयाच्या १७ व्या खंडात पान क्र. ५४६ वर आढळते तेव्हा धक्का बसतो. कारण केळुसकर गेल्यानंतर १२ वर्षांनी हे पत्र बाबासाहेबांच्या पत्त्यावरून कसे काय लिहिले जाते हे एक कोडेच आहे. यावर अधिक संशोधन व्हायला हवे.
बडोद्यातील ब्राह्मणांचे कारस्थान
 सयाजीरावांनी आपल्या प्रशासनात ब्राह्मणी वर्चस्व नियंत्रणात ठेवले होते. परंतु त्यावेळची ब्राह्मणेतरांची शिक्षणाची अवस्था आणि महाराजांचे सर्वसमावेशक धोरण विचारात घेता काही ब्राह्मण मंडळी बडोद्याच्या प्रशासनात भरपूर खोडसाळपणा करताना सापडतात. स्वत: महाराज आणि त्यांचे कुटुंबीय सातत्याने या खोडसाळपणाचा सामना करत होते. केळुसकरांचा पहिला अनुभव आपण वर चर्चेला घेतलाच आहे. बाबासाहेबांनी नोंदवलेले अनुभव तर जगविख्यात आहेत. सावित्रीबाईंच्या पेन्शनबाबत सुद्धा सुरुवातीला असा खोडसाळपणा झाला होता. या पार्श्वभूमीवर १९३२ मध्ये आर्थिक संकटात असताना केळुसकरांनी महाराजांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली असता आलेला अनुभव त्यांनी पुढील शब्दात व्यक्त केला आहे. केळुसकर लिहितात, "या एकंदर इतिहासावरून ब्राह्मणेतर लेखकास बडोदे सरकारच्या अमलात किती अडचणी असतात हे दिसून येते. मी जर अमळ कमकुवत असतो तर माझी

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४८