पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुसटशी कल्पनासुद्धा सामान्य मराठेच काय मराठा जातीतील बुद्धिजीवींनाही नाही. डॉ.पंजाबराव देशमुखांमुळे कुणबी-मराठा आरक्षणाचा लाभ मराठ्यांना मिळाला. परंतु त्यांचे नावसुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोण घेताना दिसत नाही.

 कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठा जातीतील आधुनिक काळातील पहिल्या पिढीतील प्रचंड क्षमता असणारे संशोधक- लेखक होते. शिवराय, तुकाराम आणि बुद्ध यांचे पहिले वस्तुनिष्ठ चरित्र लिहिण्याचा मान त्यांच्याकडे जातो एवढेच आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत असते. परंतु उपनिषदांचे थेट संस्कृतमधून मराठीत भाषांतर करणारे ते पहिले ब्राह्मणेतर आहेत हा इतिहास आपल्याला माहीत नसतो. सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतील पहिल्या पिढीतील कार्यकर्ते-नेते असूनही सत्यशोधक चळवळीच्या इतिहासातही त्या अंगाने त्यांची दखल घेतली जात नाही. टिळकांनी गीतारहस्य लिहिण्याअगोदर २० वर्षे केळुसकरांचा गीतेवरील टीकाग्रंथ प्रकाशित झाला होता. आपल्या परंपरेतील हा प्रेरणादायी आणि जोमदार 'धागा' आपण सोडल्यामुळे आपल्या बौद्धिक आत्मविश्वासावर याचा नकारात्मक परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर केळुसकरांना पहिले पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आणि संधी देणारे महाराजा सयाजीराव आणि केळुसकर यांचे नाते समजून घेणे उद्बोधक ठरेल.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ७