पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोथ्या ऐकावयास जाऊन बसण्यास मी मुळी कधी चुकवत नसे. पोथ्यांचा चौरंग झाडून ठेवण्याचे व दिवा लावण्याचे काम मी मोठ्या तत्परतेने करीत असे. ही माझी सेवा त्यांना फार आवडत असे. गुरुचरित्र वाचू लागले म्हणजे मला ते ऐकावयास बसू देत नसत; कारण ते शूद्रांच्या कानी पडू नये अशी त्यांची भोळी समजूत होती.” ” वयाच्या १०-१२ व्या वर्षी केळुसकरांना जातीय विषमतेचा आलेला हा पहिला अनुभव त्यांच्या भावी वाटचालीत महत्त्वाचा ठरला असावा असे त्यांच्या जीवनप्रवासावरून म्हणता येईल.
 काही दिवसानंतर कृष्णरावांचे वडील नोकरीनिमित्त मुंबईला परतल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण मुंबईतील इंग्रजी शाळेत जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शिफारशीमुळे मोफत झाले. शंकरशेठ यांनी मोफत शिक्षणासाठी शिफारस करताना वर्गात पहिल्या पाच क्रमांकात राहण्याची अट कृष्णरावांना घातली होती. या इंग्रजी शाळेतील केशवराव नावाच्या एका ब्राह्मण शिक्षकांना कृष्णरावांच्या मोफत शिक्षणाची असूया वाटत असे. फक्त ब्राह्मणांच्या मुलांनाच मोफत शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांचे पालुपद असे.

 एका महिन्यात आजारपणामुळे कृष्णराव शाळेला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा क्रमांक बराच खाली गेला. त्यावेळी केशवरावांनी कृष्णरावांना संपूर्ण फी न भरल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यावेळचा प्रसंग सांगताना केळुसकर

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ९